तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील नऊ ग्रंथालयांना आमदार सुनिल शेळके यांच्या स्थानिक विकास निधी २०२२-२३ अंतर्गत स्पर्धा परिक्षा पुस्तकांच्या संचाचे वाटप तळेगाव दाभाडे येथील आमदार शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
ग्रामीण भागातील होतकरु विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्यासाठी आवश्यक पुस्तके सहज उपलब्ध व्हावी, ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना पाठबळ देता यावे यासाठी पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसावेळी स्पर्धा परीक्षा पुस्तके देण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याअनुषंगाने मावळ तालुक्यातील एकविरा वाचनालय देवघर, गुरव समाज वाचनालय डोंगरगाव, साने गुरुजी वाचनालय लोणावळा, सेवाधाम ट्रस्ट वाचनालय तळेगाव दाभाडे, श्री गणेश मोफत वाचनालय तळेगाव दाभाडे, श्री तुळस सार्वजनिक वाचनालय डोंगरगाव, वेदांत सार्वजनिक ग्रंथालय वडगाव मावळ, यशवंत मोफत वाचनालय साते आणि कै.दिलीपभाऊ टाटीया ग्रंथालय कामशेत या नऊ ग्रंथालयांना पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उद्योजक शंकरराव शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या सदस्या रिता भूपेंद्र बाविस्कर,ग्रंथालय विभागाचे प्रदेश सरचिटणीस इसुबे चौगुले,युवक अध्यक्ष अक्षय पाटील तसेच ग्रंथालयांचे अध्यक्ष, ग्रंथपाल उपस्थित होते.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शनाचा अभाव असतो. त्यात कोचिंग क्लासची फी परवडत नाही. त्यामुळे या पुस्तक संचांचा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ घेता येणार आहे.”अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.




