मुंबई. : मुंबई महानगरपालिकेत गेल्या वर्षभरापासून घटनाबाह्य ‘मिंधे’ सरकारच्या आशीर्वादाने सुरू असलेला भ्रष्टाचार, मनमानी कारभार, पैशांची उधळपट्टी, मुंबईचे विद्रुपीकरण, जाहिरातबाजी आणि जनतेच्या पैशांच्या लुटीबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महापालिकेवर धडक मोर्चा काढला.
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा… युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडकला मोर्चा, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि मुंबईकर रस्त्यावर #Mumbai #ShivsenaUBT @AUThackeray @ShivSenaUBT_ pic.twitter.com/EIhrV4GfXS
— Saamana Online (@SaamanaOnline) July 1, 2023
या महामोर्चात पावसाची पर्वा न करता धडकलेल्या शिवसैनिकांचा महासागर लोटल्याचं चित्र पाहायला मिळालं. हजारोंच्या संख्येने निष्ठावान शिवसैनिकांनी आणि मुंबईकरांनी रस्त्यावर उतरून आदित्य ठाकरे यांना साथ दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा ‘महामोर्चा’ काढण्यात आला. मरीन लाइन्स येथील मेट्रो सिनेमापासून पालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून तमाम निष्ठावंत शिवसैनिक धडक देण्यासाठी मोर्चासोबत निघालेले पाहायला मिळाले.
मोर्चाच्या नियोजित वेळेपूर्वी मुंबई आणि उपनगर परिसरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने रेल्वे मार्गाने कूच करताना दिसत होते. यात शिवसेनेच्या रणरागिणीही पुढे होत्या. गेले दोन दिवस अजिबात उसंत न दिलेल्या पावसाची अजिबात तमा न बाळगता आपल्या नेत्याला साथ देण्यासाठी मुंबईभरातील विविध शाखांमधून शिवसैनिक धडक मोर्चासाठी हजर झाले होते.



