पिंपरी (प्रतिनिधी) राज्यातील सत्तानाट्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह पदाधिकारी, माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याचे बुधवारी (दि. ५) स्पष्ट झाले आहे. शहरातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्या मेळाव्याला मुंबईत हजेरी लावली. त्यामुळे शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची आणि राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. या राजकीय भूकंपाचे धक्के पिपरी- चिंचवडलाही बसू लागते आहेत. शहरातील पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार की अजित पवार यांच्याबरोबर जायचे, यासंदर्भात तीन दिवसांपासून संभ्रम होता. त्यामुळे शहरातील सर्व नेत्यांचे मंगळवारी (दि.४) बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र, अंतिम निर्णय झाला नव्हता,
बुधवारी (दि.५) मुंबई येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला शहरातून शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राहुल भोसले, श्याम लांडे, प्रभाकर वाघेरे, संजय वाबळे, समीर मासूळकर, युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांच्यासह आदी पदाधिकारी, महिला पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड शहरावर एकछत्री अंमल होता. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अजित पवार हेच शहरातील सर्व निर्णय घेत होते. शहरातील संघटनेतील निर्णयही अजित पवारच घेत होते. शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवार समर्थक आहेत. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे सुरुवातीपासून अजित पवार यांच्यासोबत आहेत. आताही बनसोडे यांनी अजित पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार आमचे दैवत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास अजितदादांनी केला आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून शहराचा यापुढेही विकास करण्यासाठी मोठा हातभार लागेल. शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार यांच्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– अजित गव्हाणे, शहराध्यक्ष




