पिंपरी: तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या भावाच्या खुनाचा कट उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांडभोर टोळीतील पाच आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सात पिस्तूल, २१ जीवंत काडतूसे, लोखंडी कोयता, तलवार जप्त करण्यात आली आहे.
अमित जयप्रकाश परदेशी (वय ३१, रा. डोळसनाथ मंदिराशेजारी, तळेगाव दाभाडे), मंगेश भीमराव मोरे (वय ३०, रा. माळीनगर, वडगाव मावळ), अनिल वसंत पवार (वय ३९) अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी (वय २८, दोघे रा. सिद्धार्थनगर, तळेगाव दाभाडे) आणि देवराज (रा. जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेकडील दरोडाविरोधी पथकातील पोलिसांनी २५ जून रोजी तळेगाव दाभाडे एसटी बस स्थानक परिसरातून सांडभोर टोळीचे प्रमुख प्रमोद सोपान सांडभोर आणि शरद मुरलीधर साळवी या दोघांना चार गावठी पिस्तुलासह अटक केली होती. त्यांच्याकडे सखोल तपास करण्यात आला असता किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आमदार शेळके यांच्या भावावर हल्ला करण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.




