नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार नवे मुख्यमंत्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एवढेच नव्हे तर, ११ ऑगस्टला शपथविधी होणार असल्याचेही समजते. एका इंग्रजी न्यूज पोर्टलने देखील तसा दावा केला आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र घोषित करतील. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडेल. त्यामुळे आपसूकच राज्य मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे या पोर्टलने सूत्रांचा दाखला देत म्हटले आहे.
अजित पवारांसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत हा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे, असे देखील सांगण्यात आले आहे. या दाव्यामुळे अगोदरच अस्वस्थता पसरलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. एवढेच नाही तर, राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी जून २०२२ मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. तत्पूर्वी, अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. पण भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी ही योजना फसली.



