पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली झाली असून विजयकुमार खोराटे यांची त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपा- शिवसेना सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सहभाग घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाघ यांच्या बदलीनंतर या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले होते. महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.
नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.
जितेंद्र वाघ यांचा कार्यकाळ उल्लेखनीय…
जितेंद्र वाघ यांची 21 सप्टेंबर 2021 रोजी अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. वाघ यांनी पावणे दोन वर्षांच्या कारकीर्दीत चांगले काम केले. शांत, संयमी, मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख होती. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने वाघ यांची महापालिकेतील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. त्यांची सेवा त्यांच्या मूळ महसूल व वन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्याधिकारी संवर्गातील विजयकुमार खोराटे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी काढले आहेत.




