देहूगाव ( वार्ताहर ) देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुमारे अडीच महिन्यापासून सुट्टीवर असल्याने आणि प्रभारी मुख्याधिकारी यांच्याकडे दोन नगरपंचायतीचे कारभार असल्याने आठवड्यातून एखाद दोन दिवस वगळता गैरहजर असतात. त्यामुळे वर्षभर कामांचा ठेका असणाऱ्या ठेकेदारांची चंगळ होत आहे. अनेक कर्मचारी विना कामामुळे बसून असतात. तर विविध समस्यांसह मूलभूत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे.
तीर्थक्षेत्र देहूमध्ये वर्षातून तीन मोठ्या यात्रा भरतात तर हजारो भावीक प्रतिदिन दर्शनार्थ येत असतात. वाढत्या लोकसंख्येमुळे ८ डिसेंबर २०२० मध्ये ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. प्रशासकीय कारभार सुरू असताना देहू नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पदी डॉ.प्रशांत जाधव यांची नियुक्ती झाली. सव्वा वर्षापूर्वी देहू नगरपंचायतीची निवडणूक होऊन नगरसेवकांची नियुक्ती झाली. मात्र सुमारे अडीच महिन्यांपासून मुख्याधिकारी डॉ.जाधव रजेवर गेले आहेत ते अद्यापही आलेले नाहीत . दरम्यान वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांच्याकडे देहूच्या कारभारासाठी प्रभारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली.आषाढी वारी पालखी सोहळया वेळी मुख्याधिकारी डॉ.निकम यांनी तळ ठोकून संपूर्ण कामकाज पाहिले. वडगाव आणि देहू दोन्ही नगरपंचायतीचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी असल्याने त्यांची दमछाक होत आहे.
सध्या पावसाळा सुरू असून पावसाळ्यापूर्वीची कामे आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे असणारी कामे तसेच नागरिक मूलभूत समस्या,विविध विकासकामे रखडली आहेत. नगरोत्थान निधीतील सुमारे चार कोटी रुपये निधी देहू नगरपंचायतीकडे जमा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र विविध विकासकामांच्या निविदा व कामाच्या आदेश नसल्याने हा निधी पडून असून अनेक कामेही रखडली आहे. नागरिकांचे विविध समस्या, हंगामी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच नगरपंचायतीमध्ये समाविष्ट न झालेल्या कायम कर्मचाऱ्यांचा प्रश्न अशा विविध समस्या निर्माण झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. देहूची नगरपंचायत नव्याने असल्याने आणि कारभार मोठा असल्याने कायम असणारे मुख्याधिकारी हवा आहे. सुट्टीवर गेलेले मुख्याधिकारी पुन्हा परतणार का ? नवीन मुख्याधिकारी नगरपंचायतीला मिळणार ? असा प्रश्न देहूकर करीत आहे.




