तळेगांव : तळेगाव दाभाडे शहराचे माजी उपनगराध्यक्ष व नामवंत उद्योजक रामदास काकडे यांनी काँग्रेस पक्षात परत सक्रिय होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने मावळ तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढून पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेली कित्येक वर्षे राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या रामदास काकडे यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत लवकरच त्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम होणार आहे.
तालुक्यात काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एका प्रबळ नेत्याची गरज पक्षाला होती. रामदास काकडे यांच्या सारखा तगडा नेता सक्रिय होण्यामुळे काँग्रेसच्या पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल, असे मानले जात आहे.




