नवी दिल्ली, दि. १० – राज्यातील सत्तासंघर्षासह राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रकरणावर उद्या, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर उद्या केस लिस्ट करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना कोर्टात स्थगिती देण्यात आली आहे. आता ही स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी न्यायमूर्ती जोसेफ यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. पण ते निवृत्त झाल्यानंतर आता हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आले आहे. राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबतचा घोळ तीन वर्षाहून अधिक काळापासून असल्याचे दिसून येते. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ सदस्यांची यादी पाठवली. पण राज्यपालांकडून या यादीला ना हिरवा कंदील देण्यात आला, ना यादी मंजूर करण्याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले. या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.


