पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी आकुर्डी आणि पिंपरी येथे गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. येथील ९३८ सदनिकांसाठी सोमवार (दि. १०) पर्यंत ९ हजार १२८ जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ४५२ जणांनी १० हजार ५०० रूपये शुल्क भरले आहे.
आकुर्डी येथील गृहप्रकल्पात एकूण ५६८ सदनिका आहेत. पिंपरीत ३७० सदनिका आहेत. हे दोन्ही गृहप्रकल्प तयार आहेत. सदनिकेसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी) व दिव्यांग असे आरक्षण आहे. आकुर्डीतील सदनिकेसाठी ७ लाख ३५ हजार २५५ रूपये आणि पिंपरीतील सदनिकेसाठी ७ लाख ९२ हजार ६९९ रूपये स्वहिस्सा भरावा लागणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून २८ जूनपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
१३ दिवसांत एकूण ९ हजार १२८ अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ४५२ अर्जदारांनी १० हजार रूपये अनामत रक्कम व ५०० रूपये नोंदणी शुल्क ऑनलाइन जमा केले आहे. अर्ज २८ जुलैपर्यंत ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी इच्छूकांना आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.




