पुणे : राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकतं अशी समज आता सर्वसामान्यांची झाली आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने सरकार स्थापन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपसोबत सत्तेत गेले.
त्यानंतर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड करत शिंदे -फडणवीस यांच्या महायुतीत प्रवेश केला अन् सत्ता स्थापन केली. त्यावर आता भाजपच्या बड्या नेत्यांनी अजित पवारांबाबत मोठं भाष्य केलं आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यातच आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असेल तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील असंही काकडे म्हटलंय.
वरिष्ठ स्तरावर काय ठरलं आहे ते पाहावं लागणार आहे. परंतु भाजपसोबत आल्याचा अजित पवार यांना फायदा होणार आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा भाजप अन् मित्र पक्षाला मिळतील. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे यांचा आम्हाला फायदाच होणार आहे. पुणे शहारात भाजपचे ९८ नगरसेवक आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला मिळेल असंही त्यांनी सांगितले आहे.



