मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्य सरकारनं गुरुवारी (२० जुलै) रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर याच दिवशी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे.
मुंबईसह कोकण आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु असल्यानं राज्य सरकारकडून गुरुवारी, 20 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं मंडळाच्या दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या द्वितीय भाषा या एनएसक्यूएफ मधील हिंदी आणि समाजशास्त्र या विषयातील परीक्षा असून या परीक्षेला राज्यभरातून केवळ 41 विद्यार्थी बसणार होते. तर दुसरीकडे बारावीच्या द्वितीय भाषा या विषयातील मराठी उर्दू हिंदी आधी विषयाची परीक्षा असून या परीक्षेला राज्यभरातून ८ हजाराहून अधिक विद्यार्थी बसणार होते.


