
पिंपरी :- यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या वतीने प्राधिकरण, निगडी येथील संत तुकाराम उद्यानाशेजारील ४४ गुंठा जागेत यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्या स्मारकासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका दुसऱ्यांदा ५ कोटी रुपयांचे अनुदान देत आहे. अनुदान वर्ग करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर हे अनुदान समितीला दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेरगाव येथे १६ जूनला झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात या समितीने ५ कोटी निधीची मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली होती. त्यानुसार पालिकेने तात्काळ कार्यवाही करीत तो प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवला.
समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी स्मारकासाठी पालिकेने ५ कोटीचे अनुदान द्यावे, असे पत्र दिले होते. या स्मारकामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा, ग्रंथालय, वाचनालय, सांस्कृतिक भवन, गोरगरीब व अनाथ मुलांसाठी वसतिगृह, वधू-वर सूचक मंडळ, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र, वैद्यकीय उपचार केंद्र, व्यायामशाळा बांधण्यात येणार आहे. स्मारकाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी २० कोटीचा खर्च अपेक्षित आहे.
स्मारकाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ८८ व ६६ (२५) मधील तरतुदीनुसार स्मारक समितीस ५ कोटी रुपयांचे अनुदान अदा करणे आणि अनुदान या लेखाशिर्षावर वर्ग करण्यास आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान, या पूर्वी पालिकेने समितीला ५ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.




