
अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन दोन महिन्यांहून अधिकचा काळ लोटला आहे. तरीही संबंधित १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यात आला नाही. अलीकडेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट व शिंदे गट) सर्व आमदारांना नोटीसा पाठवल्या होत्या. तुम्हाला अपात्र का ठरवलं जाऊ नये? याबाबत विचारणा केली होती.
यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी उत्तर दिलं नाही. आम्ही अध्यक्षांच्या नोटीसला उत्तर देणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाच्या आमदारांनी घेतली आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राहुल नार्वेकरांना पाठवलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला ठाकरे गटाच्या आमदारांना उत्तरं द्यावी लागतील. अन्यथा त्यांना कायदेशीर अडचण निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली.
शहाजीबापू पाटील म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांची नोटीस आम्हा सर्वांना पोहोचली होती. त्याबाबतीत आम्ही उत्तरं दिली आहेत. उद्धव ठाकरे गटाकडे जे सोळा आमदार आहेत, त्यांनाही नोटीस पाठवली होती. त्यामुळे त्यांना उत्तरं द्यावी लागतील. त्यांनी उत्तरं दिली नाहीत, तर कायदेशीररित्या त्यांची अडचण निर्माण होईल.”



