विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. साधनसुचितेचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपाने अद्यापही किरीट सोमय्यांवर कारवाई केलेली नाही असा मुद्दा उपस्थित केला. तसेच सोमय्यांच्या जागेवर इतर सामान्य कार्यकर्ता असता तर काय झालं असतं हेही नमूद केलं. ते बुधवारी (१९ जुलै) विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
अंबादास दानवे म्हणाले, “मी विधान परिषदेत पेन ड्राईव्ह दिला आहे. त्या पेन ड्राईव्हमधील माहिती सभापती तपासतील. मी त्याची तपासणी केली आहे. सुरक्षिततेच्या आणि सामाजिक हिताच्या दृष्टीने हे उघड करणं योग्य होणार नाही. माझ्याकडे अनेकांनी हा पेनड्राईव्ह मागितला आहे. मात्र, मी सभापती सोडून इतर कुणालाही हा पेनड्राईव्ह दिलेला नाही.



