पिंपरी (प्रतिनिधी) चोऱ्या होऊ नये तसेच अपघाताची माहिती मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र या सीसीटीव्हीचे प्रेक्षपण पोलिसांना दिलेले नाही. त्यामुळे सीसीटीव्हीच्या डीपी बॉक्समधून साहित्य चोरीला गेल्याचे ओटास्कीम, निगडी येथे दिसून आले.
पुण्यामध्ये जंगली महाराज रोड येथे झालेल्या बॉम्ब स्फोट प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. मात्र हे सीसीटीव्ही कॅमेरे पुरेसे नसल्याने स्मार्ट सिटी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने वेगवेगळ्या प्रकल्प अंतर्गत शहरातील बहुतांश चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र या सीसीटीव्हीचे प्रक्षेपण पोलिसांना दिलेले नाही. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ओटास्कीम, पेठ क्रमांक २२ येथील आंबेडकर वसाहत येथील सीसीटीव्हीच्या डीपी बॉक्समधील बॅटऱ्या व इतर साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीने पोलिसांना याबाबत कळविले आहे. मात्र हे साहित्य कोणी चोरून नेले याबाबत पोलिसांना माहिती मिळालेली नाही.



