मुंबई – साताऱ्यातील फलटण-शिंगणापूर मार्गावरील सोनवडी बुद्रुक येथे कोळसा भट्टीत काम करणाऱ्या एका आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत कोळसा भट्टीमालकासह अन्य चार जणांनी या महिलेवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. या धक्कादायक घटनेबाबत आज विधान परिषदेत शशिकांत शिंदे यांच्याकडून लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या घटनेतील पीडित महिलेला तत्काळ न्याय देण्यात यावा. तसेच गरीब कातकरी कुटुंबाला कोळसा उत्पादन करणाऱ्या मालकांपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी शशिकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आली. या मागणीला उत्तर देत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आदिवासी समाजासाठी सर्वंकष अशा योजना तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, साताऱ्यातील घटनेमध्ये बाळू शेठ याने त्याच्या कोळसा भट्टीवर काम करण्यासाठी मजूर ठेवले होते. सुधागड तालुक्यातून हे मजूर नेण्यात आले होते. ज्या महिलेवर अत्याचार झाला तिने कशातरी पद्धतीने तिथून पळ काढला आणि ती महिला तिच्या तालुक्याला परतली. या घटनेनंतर आदिवासी विकास आढाव समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी विशेष जबाबदारी पार पाडली.



