पिंपरी (प्रतिनिधी) राज्यातील सत्ता बदलानंतर तात्कालीन आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त- १ विकास ढाकणे यांच्या शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ बदली केली होती. मात्र अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ कायम राहिले होते. वाघ यांची बदली मागील 14 दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यांनंतर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त-२ पदाचा सुरू असलेला प्रशासकीय आणि राजकीय गोंधळ १४ दिवसांनी संपुष्टात आला आहे. नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गुरुवारी (दि. २०) पलिका सेवेत रुजू करून घेतले आहे.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची (दि.६) जुलैला बदली झाली. त्यांच्या जागी सोलापूर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांची नियुती करण्यात आली. खोराटे हे दुसऱ्याच दिवशी म्हणजे (दि.७) जुलैला पालिकेत रुजू झाले. मात्र त्यांच्याकडे अद्याप अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आलेला नव्हता. तसेच वाघ यांची बदली झाली असली तरी खोराटे यांच्याकडे पदभार देऊ नये, असे एका नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्याने थेट आयुक्त सिंह यांना फोन करून तोंडी आदेश दिला होता. त्यामुळे सिंह यांनी लेखी आदेशापेक्षा तोंडी आदेशाला महत्त्व देऊन खोराटे यांच्याकडे पदभार दिला नव्हता.
दरम्यान, आयुक्त सिंह हे तीन दिवस मंत्रालयात होते. यावेळी एका वरिष्ठ मंत्र्यांने खोराटे यांना रुजू करून घेण्याच्या सूचना आयुक्त सिंह यांना दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार गुरुवारी (दि. २०) अतिरिक्त आयुक खोराटे यांना पालिका सेवेत आयुक्त खोराटे यांना पालिका सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे. त्यांनी प्रशासकीय कामकाजही सुरू केले आहे.




