पिंपरी (प्रतिनिधी) मावळ पट्ट्यात गेल्या चार दिवसांपासून कोसळणाच्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतक गाठले आहे. धरणातील पाणीसाठा ५५ टक्के झाल्याने शहरवासीयांना सहा महिने पाण्याची चिंता मिटली आहे. जूनपासून धरण परिसरात १ हजार ९९ मिमी पाऊस पडल्याची माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी दिली.
पवना धरण परिसरात सोमवारी (दि. १७) पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेली दोन दिवस शंभर मिमीच्या आसपास पाऊस पडत होता. तर बुधवारी २४ तासात तब्बल १४३ तर गुरूवारी सायंकाळपर्यंत २९ मिमी पाऊस पडला. त्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा ५०.४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तर गतवर्षी आजच्या तारखेला धरणात ७० टक्क्यांपेक्षा जास्त होता. यंदा धरणात गतवर्षांपेक्षा २० टक्के पाणीसाठा कमी आहे.




