पिंपरी, दि. ३१ जुलै – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बो-हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या गृह प्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण तसेच डुडुळगाव येथे साकारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच मोशी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन देखील प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे तसेच खासदार, आमदार यांच्यासह मुख्य सचिव मनोज सवनिक, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, के. एच. गोविंद राज, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पी. एम. आर. डी. ए. चे आयुक्त राहुल महिवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी सुक्या कचऱ्यापासून ७०० टी.पी.डी क्षमतेच्या प्रकल्पामधून १४ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ज्यामध्ये १००० टी.पी.डी क्षमतेच्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलीटी व ५०० टी. पी. डी क्षमतेच्या कंपोस्ट प्लांटचा समावेश आहे. यातील १२ मेगावॅट तयार झालेली वीज महानगरपालिका वापरणार आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नुसार ऍन्थोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रायवेट लिमिटेड यांच्या मार्फत विकसित केला गेला असून २१ वर्षे कालावधीसाठी चालविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये खर्च झालेला आहे.
महापालिकेचा हा महत्वकांशी प्रकल्प कार्यान्वित होत असून यामुळे कचरा डंपिंगसाठी अधिकच्या जागेची आवश्यकता भासणार नाही. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज बिलात सुमारे ३५ टक्के ते ४० टक्के बचत होणार आहे.
बो-हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १२८८ सदनिका उभारण्यात आल्या आहेत. या प्रकल्पातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात सदनिकांचे हस्तांतरण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत १२७.७० कोटी रुपये इतकी आहे. सिमाभिंत, अंतर्गत रस्ते, पथदिवे, पावसाळी गटर, पाणीपुरवठा नलिका, जलनि:सारण नलिका, ट्रान्सफॉर्मर इत्यादी मुलभूत सुविधा अंतर्गत कामे करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मलशुद्धीकरण केंद्र आणि सेंद्रिय कचरा विघटन या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने १९९० सदनिका उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.




