
विरोधकांनी २६ पक्षांना एकत्र करून ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केली. त्यानंतर भाजपानेही एनडीएत प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. एनडीएमध्ये उत्साही वातावरण टिकून राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए युतीमधील खासदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. विरोधकांच्या आणि आपल्या आघाडीमध्ये फरक असल्याचे मोदींनी खासदारांना सांगितले. आपली युती होण्यास ‘कारण’ होते, तर विरोधक ‘स्वार्थासाठी’ एकत्र आले असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. सूत्रांनी माहिती दिली की, इंडिया आघाडीकडे पाहून खासदारांनी विचलित होऊ नये, अशी सूचना मोदी यांनी दिली आहे. लोक अजूनही या पक्षांनी (विरोधक) केलेल्या जुन्या भ्रष्टाचार प्रकरणांना विसरलेले नाहीत. त्यांच्या जुन्या पापांमुळे लोक अजूनही त्यांचा द्वेष करतात, असेही मोदी यांनी सांगितले.
सोमवारी (दि. ३१ जुलै) पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र सदनमध्ये एनडीएच्या ४५ खासदारांची पहिली बैठक घेतली. या बैठकीला पश्चिम उत्तर प्रदेश आणि कानपूर-बुंदेलखंड क्षेत्रातील खासदार उपस्थित होते. मोदी यांनी यावेळी विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. बिहार विधानसभा निवडणुकीत २०२० साली जनता दल (यू) पेक्षा भाजपाच्या जास्त जागा येऊनही नितीश कुमार यांना मुख्यंमत्रीपद का दिले? तसेच पंजाबमध्ये अकाली दलाच्या सरकारला पाठिंबा दिला असताना भाजपाने उपमुख्यमंत्रीपद का घेतले नाही? यामागची कारणीमीमांसा सांगून मोदी यांनी युतीधर्माचे दाखले दिले. तसेच खासदारांनी इतरांना सोबत घेऊन काम करत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एनडीएचेच सरकार येईल, असे प्रयत्न करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.


