
इस्लामपूर- शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षात आज प्रवेश केला. साखराळे येथे रघुनाथदादा पाटील यांच्या घरी स्नेहभोजनानंतर आम्ही त्यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचे घोषित केले. 9 ऑगस्टला क्रांतीदिनी इस्लामपूर येथे सुमारे 50 हजार शेतकर्यांचा मेळावा घेवून पक्षाची भुमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रशेखरराव म्हणाले, “ रघुनाथदादा हे राज्यातील तसेच देश पातळीवरील शेतकर्यांच्या प्रश्नावर लढणारे मोठे नेतृत्व आहे. ते आमच्या पक्षात आल्याने आमची ताकद वाढली आहे. रघुनाथदादा म्हणाले, राज्य व देश पातळीवरील भाजपचे सरकार हे लुटारुंचे सरकार आहे. आजवर त्यांनी शेतकर्यांच्याकडे दुर्लक्षच केले आहे. के चंद्रशेखरराव हे तेलंगणामध्ये प्रत्येक शेतकर्याला पेरणीआधी एकरी दहा हजार रुपये देतात. शेतीसाठी मोफत वीज देवून शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आम्ही आजपर्यंत राज्यातील सरकारला अनेकवेळा शेतकर्यांच्या प्रश्नाविषयी सांगून पाहिले, मात्र हे सरकार नालायक आहे, त्यांना शेतकर्यांशी देणेघेणे नाही. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकर्यांचे भले व्हावे यासाठी आम्ही भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. 9 ऑगस्टला इस्लामपूर येथे सुमारे 50 हजार शेतकर्यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेवून या बाबतची भुमिका स्पष्ट केली जाईल.



