मुंबई : फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईच्या आयआयटीमध्ये दर्शन सोलंकी नावाच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यानं आपल्या हॉस्टेलच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दर्शनला जातीभेदाचा सामना करावा लागल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईतील परिस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे आता आयआयटी मुंबई व्यवस्थापनाने कोणत्याही परिस्थितीत जातीभेदाला खतपाणी मिळू नये, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना त्यांचे JEE Advanced किंवा GATE चे गुण विचारू नयेत, अशी सूचना करण्यात आली आहे.
काय आहे परिपत्रकात?
IIT मुंबईनं विद्यार्थ्यांना या मार्गदर्शक सूचना देण्यासाठी जाहीर परिपत्रक काढलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी संस्थेच्या परिसरात कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं, याबाबतच्या नियमावलीचा समावेश करण्यात आला आहे. “विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना त्यांचे JEE Advanced किंवा GATE च्या परीक्षांचे गुण विचारू नयेत. अशा प्राकरची विचारणा ही त्यांची जात जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणून पाहिली जाऊ शकते. यातून जातीभेदाला खतपाणी मिळू शकतं”, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
हे परिपत्रक आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलं आहे. विशेषत: हॉस्टेल परिसरात हे परिपत्रक पाहायला मिळत आहे. “अशा प्रकारे इतरांना गुण विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यात काहीही चुकीचं वाटत नसावं. उत्सुकतेपोटी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण असे प्रश्न बऱ्याचदा इतर विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम करणारे ठरतात. जात, धर्म किंवा इतर कोणत्याही सामाजिक-आर्थिक घटकांशिवाय विद्यार्थ्यांमध्ये सहसंबंध निर्माण व्हायला हवेत”, असंही या पत्रकात नमूद केलं आहे.



