पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे अनेक आमदारही गटात आले असून भाजपसोबत सत्तेत सहभागीही झाले आहेत. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाशी चांगलीच जवळीक वाढली आहे. ४ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी अजित पवारांना थाप दिल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता, गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले असता, त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. @AmitShah जी यांचे पुणे विमानतळावर मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या सोबत स्वागत केले. pic.twitter.com/w4diZYBy8q
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 5, 2023
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले असून रविवारी त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या एका पोर्टलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी देशभरातील बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठकही होणार आहे. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी विमानतळावर गृहमंत्र्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
अमित शहांनी विमानातून उतरताच मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी बुके देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर, अजित पवार यांनीही बुके देऊन गृहमंत्र्यांचं स्वागत केलं. यावेळी, अमित शहांनी स्मीतहास्य करत अजित पवारांसोबत गप्पा मारल्या, काही सेंकद गप्पा मारल्यानंतर हात जोडून ते पुढे निघून गेले. या प्रसंगाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांच्या पाठीवर थाप मारली होती. या घटनेचाही व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल झाला होता. त्यानंतर, आता अमित शहांसोबतही अजित पवारांचा दिलखुलास संवाद होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.



