पिंपरी : महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रामधील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी प्रत्येकी एक विशेष पथकांची नेमणूक केली आहे. त्यात एक वाहन, दोन मजूर आणि दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्याचा समावेश आहे. पावसाळ्यातील सर्व दिवस ही पथके तैनात ठेवली आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली.
चिखली सोनवणे वस्ती रस्ता, तळवडे रुपीनगर मुख्य रस्ता, टॉवर लाईन रस्ता, चिखलीगाव रस्ता, चिखली मोरेवस्ती येथील वाघु साने चौक ते चिंचेचा मळा रस्ता, मुकाई चौक ते किवळे गावात जाणारा रस्ता, पुनावळे अंडरपास ते गायकवाडनगर आणि कोयते वस्ती परिसरातील बुजविलेल्या खड्ड्यांची पाहणी अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी केली.
त्यादरम्यान रस्त्यांवर आढळलेले विविध ठिकाणांचे खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळ्यानंतर डांबर किंवा कोल्डमिक्स पद्धतीने खड्डे भरण्यात येणार आहेत. जांभळे यांच्यासमवेत सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, देवान्ना गट्टूवार, उपअभियंता शालीग्राम अंदुरे होते.




