मुंबई: मुंबई महानगरपालिकेने यंदा गणेशोत्सवासाठी लागू केलेली चार पुटांच्या गणेशमूर्तीची अट हमीपत्रातून वगळली आहे. पालिका प्रशासनाने नवे हमीपत्र जारी करीत गणेशोत्सव मंडळांना दिलासा दिला आहे. नव्या हमीपत्रात पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आणि गणेशमूर्तीची उंची कमीत कमी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
येत्या १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईत १२ हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यापैकी रस्त्यावर मंडप उभारून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी घ्यावी लागते. गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगी देण्यासाठी १ ऑगस्टपासून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. मंडप परवानगी देताना मंडळांकडून एक हमीपत्रही लिहून घेण्यात येत आहे. आधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या हमीपत्रात मंडळाच्या गणेशमूर्तीची उंची चार फूट असावी व मूर्ती पर्यावरणपूरक असावी अशी अट घालण्यात आली होती.
तसेच या हमीपत्रात करोनाकाळातील नियमच पुन्हा एकदा लावण्यात आले होते. त्यामुळे मंडळांनी या हमीपत्राबाबत नाराजी व्यक्त केली होती. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने या हमीपत्राला आक्षेप घेतला होता. अटींचा पुनर्विचार करून नवे हमीपत्र जारी करावे, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच मंडळांनीही हे हमीपत्र देण्यास नकार दिला होता. मात्र पालिका प्रशासनाने आता हमीपत्रातील गणेशमूर्तीच्या उंचीची अट काढून टाकल्याची माहिती मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.
गणेशमूर्तींवरील उंचीच्या मर्यादेची अट हमीपत्रातून वगळण्यात आली असून यंदा पीओपी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करता येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह पीओपीची गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना महानगरपालिकेकडून दिलासा मिळाला आहे. गणेश मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर १ ऑगस्ट २०२३ पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > नागरिकांकरिता टॅब >अर्ज करा >मंडप (गणेश/नवरात्रोत्सव) > Ganpati/Navaraytri Mandap Application मध्ये नमूद केलेल्या लिंकवर १ ऑगस्टपासून १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
- या अटी कायम
शाडूच्या किंवा पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेल्या मूर्तीच्या मागे उजव्या खांद्यावर हिरव्या रंगाचे वर्तुळ आणि ‘पीओपी’ची मूर्ती असल्यास लाल रंगाच्या वर्तुळाची खूण करणे आवश्यक आहे. त्याची खातरजमा मंडळांना करावी लागणार आहे. मूर्तीचे विसर्जन जवळच्या कृत्रिम तलावात करण्याचा प्रयत्न करू, असेही या हमीपत्रात म्हटले आहे.



