नवी दिल्ली : पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण साळुंके, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ आज जाहीर करण्यात आले. यासह राज्यातील 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’, तर 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’, असे राज्यातील एकूण 76 पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे.
राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 954 पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 76 पोलिसांचा समावेश आहे.



