पिंपरी (वार्ताहर) काळेवाडीतील तापकीर चौक, कुणाल हॉटेल ते नखाते वस्ती चौकाला जोडणाऱ्या लिंक रोडच्या दोन्ही बाजूला खासगी वाहनचालक आपली वाहने लावत आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होत असून वाहतूक कोंडी होत आहे. याकडे वाहतूक विभागाचे लक्ष नसल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनधिकृत पार्किंग करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
रहाटणी व काळेवाडी परिसराला जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. परंतु या मार्गावर अनधिकृत वाहन पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. बऱ्याच वेळा उभा केलेल्या वाहनांमुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. काही वाहने तर कित्येक दिवस एका ठिकाणावरून हालत नाहीत. अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.




