पुणे : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगार अक्षयसिंग जुन्नी याच्यासह त्याच्या टोळीतील तीन साथीदारांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली. मोका कायद्यान्वये झाली ही ५१ वी कारवाई आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न, दुखापत, घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी टोळीप्रमुख अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी (वय २२, रा. वैदूवाडी), कुलदीपसिंग ऊर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी (वय २१, रा. बिराजदार नगर), विशाल ऊर्फ मॅक्स किशोर पुरेबीया (वय २२, . जुना म्हाडा कॉलनी, वैदूवाडी) यांना अटक करण्यात आली. या आरोपींनी ३१ जुलै रोजी एका व्यावसायिकाला फ्लेक्स लावण्यासाठी दरमहा हप्ता देण्याची मागणी केली. परंतु व्यावसायिकाने नकार दिला. त्यामुळे आरोपींनी शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. त्यानंतर आरोपींनी हत्यारे फिरवत परिसरात दहशत निर्माण केली होती.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी या टोळीवर कारवाईचे आदेश दिले होते. हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत मोकाचा प्रस्ताव दिला. अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी प्रस्तावास मंजुरी दिली. पुढील तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख- केदार करीत आहेत.



