पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील संस्थांची महत्त्वाची समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान पुण्यात होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटन सचिव बी. एल. संतोष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बैठकीस पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत.
संघ आणि परिवारातील संस्थांची अखिल भारतीय स्तरावरील समन्वयाची बैठक पहिल्यांदाच पुण्यात होणार आहे. संघाचे सर्व केंद्रीय पदाधिकारी, परिवारातील संस्थांचे प्रमुख बैठकीत सहभागी होतील. देशाच्या विविध भागांतून ३०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर बैठक होईल. त्यासाठीचे शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संघ परिवारात सुमारे ६० हून अधिक संस्था आहेत. तीन दिवसांच्या बैठकीत त्यांचे प्रमुख वर्षभरातील कार्याचा आढावा घेऊन आगामी काळातील नियोजन मांडणार आहेत. भाजप, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ आदी विविध संघटनांचा त्यात समावेश आहे. या संस्था उद्योग, कामगार, विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यामुळे झालेल्या कार्याचा आढावा घेतानाच त्यांची भविष्याची दिशा या बैठकीत ठरते.




