- उपमुख्यमंत्री अजितदादांनी पंकज भालेकर यांच्या मागणीवर तात्काळ कारवाई करण्याचे आयुक्तांना दिले निर्देश.
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील भूमिपुत्रांनी सामायिक गट नंबर असलेल्या जागेमध्ये घरे बांधली. बहुदा खरेदी विक्री शिवाय नातेवाईक, रक्तातील, वडिलोपार्जित जागेवर शहरातील अनेक भागात स्थानिकांनी आपली घरांची बांधकामे केली. अशा घरांच्या नोंदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडे करण्यासाठी र.रु. १०० च्या स्टैंप पेपरवर वाटणीपत्र करुन नोंदी होत होत्या.
परंतु अलिकडच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत स्थानिक रहिवाशी यांच्या घराच्या नोंदी थांबविण्यात आलेल्या आहेत. घराची जागा अत्यंत कमी असुनसद्धी वाटपपत्राकरीता नागरीकांना संपूर्ण जागेची स्टैंप ड्युटी भरून वाटपपत्र करावे लागते. बहुतेक वेळेस घराच्या बांधकामापेक्षा खुप जास्त सामायिक जागेचे मुल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी नागरीकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच स्थानिक नागरीकांच्या अंतर्गत वादामुळे सर्वजन एकत्र येऊन वाटणीपत्रासाठी उपस्थित रहात नाहीत. परिणामी स्थानिक नागरीक मिळकतकराची नोंद होत नसल्याने कर भरू शकत नाही. त्यामुळे या नोंदीमध्ये सुधारणा करून पूर्वीप्रमाणेच नोंदी कराव्यात अशी मागणी माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

तसेच मिळकत कर नोंदणी प्रकरणामध्ये आपण लक्ष देऊन र.रु. ५०० च्या स्टॅप पेपरवरील वाटणीपत्रानुसार मिळकत कराच्या नोंदी करून घेणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना आदेश दिले. त्यामुळे पंकज भालेकर यांच्या मागणीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक स्थानिक भूमिपुत्रांच्या आपल्या नातेवाईक व वडिलोपार्जित जमिनीतील वारसदारांच्या नोंदी कमी रकमेमध्ये होऊन मिळकतकरावरती नावे दाखल होणार आहेत.



