मंचर : येथे राहणारे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे अधिकारी राजेंद्र शांताराम घोलप (वय ३३) यांनी राहत्या घरात पंख्यास गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचोली कोकणे (ता. आंबेगाव) हे राजेंद्र घोलप यांचे मूळगाव आहे. गेली काही वर्ष नोकरीनिमित्ताने ते मंचर शहरात मुळेवाडी रस्तावर हिराबाग गृहनिर्माण सोसायटीत आई, पत्नी, दोन मुलांसह राहत होते. सध्या ते मोशी येथे युनिटी स्मॉल फायनान्सच्या शाखेत कार्यरत होते. शुक्रवारी (ता. २५) रात्री बँकेतून ते मंचरला घरी आले. जेवण केल्यानंतर रात्री दहा वाजता ते त्यांच्या झोपण्याच्या खोलीत गेले व आतून दरवाजा बंद केला. शनिवारी (ता. २६) सकाळी साडेसहा वाजता ते नेहमीप्रमाणे उठतील, असा अंदाज होता. पण, दरवाजा ठोठावूनही त्यांचा आवाज आला नाही. त्यामुळे त्यांचे चुलत भाऊ संतोष घोलप, सुरक्षा रक्षक व शेजारी राहणाऱ्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी राजेंद्र हे पंख्याला गळफास घेतलेला आढळून आले.




