पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान झाल्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा पिंपरी चिंचवड शहरात लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी दोन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर येत महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. तब्बल अडीच ते तीन तास अधिकाऱ्यांच्या बैठकीत शहरातील सर्व कामांचा आढावा घेत काही कामांच्या चौकशीचेही सुतवाच केला. तर केवळ भोसरी विधानसभेतच विकास कामे नकोत इतरही शहरातील भागात विकास कामे व्हायला पाहिजेत असे सांगत शहरात पुन्हा अजितदादा यांचाच वचक राहणार असे स्पष्ट दिसले.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल 40 ते 50 दिवसानंतर पहिल्यांदाच आपले लाडके नेते अजित पवार शहरात येत असल्याने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनी त्यांच्यात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समित बैठक घेतली. यावेळी भाजपचे दोन्हीही आमदार व शिंदे गटाचे खासदार या बैठकीला उपस्थित नसल्याचे दिसून आले. कोरोना काळात झालेल्या गैरकारभाराचे लेखापरीक्षण ऑडिट करायला सांगून भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसरीकडे विकास कामे करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना विचारात घ्या असा सल्ला दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात भाजप शिवसेना युतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गट गेल्याने शहरात स्थानिक पातळीवरील तिनेही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येतील अशी शक्यता होती. मात्र अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड दौरा अचानक ठरल्यामुळे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आजारी असल्याने व निमंत्रण नसल्याने बैठकीला उपस्थित नव्हतो. तर शिंदे गटाचे शहराध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर यांनी नातीचा वाढदिवस असल्याने मी बाहेरगावी होतो आणि निमंत्रण नव्हते म्हणून उपस्थित नाही असे सांगितले.
एकूणच महापालिकेतील बैठकीला भाजप शिवसेनेचा एकही पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित नव्हते तर तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्व आजी माजी नगरसेवक मुख्य नेते पदाधिकारी व कार्यकर्ते महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर पुन्हा पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांनी लक्ष घातल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले. अजित पवार यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक महायुतीतून लढवणार असल्याचे सांगून महापालिका निवडणुका स्थानिक पातळीवर विचार करून लढवू असे सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.




