पुणे : आंतरराष्ट्रीय शुद्ध हवा दिनाच्या निमित्ताने गुरुवारी (ता. ७) शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत बस प्रवास दिन (बस डे) जाहीर करण्याची मागणी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी ‘पीएमपी’कडे केली आहे, तर दोन्ही महापालिकांनी त्या दिवसांचा बस प्रवासाचा खर्च दिल्यास प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे ‘पीएमपी’ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वाढत्या प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक गरजेची आहे. मात्र, वायू प्रदूषणामुळे विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास होतो, तसेच सर्वांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे लक्षात घेऊन ७ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शुद्ध हवा दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने गुरुवारी मोफत बस प्रवासाची मागणी ‘पुणे एअर ॲक्शन हब’ या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सक्रिय असलेल्या मंचाने ‘पीएमपी’ आणि दोन्ही महापालिकांकडे केली आहे.
‘पुणे एअर ॲक्शन हब’च्या प्रतिनिधी हेमा चारी म्हणाल्या की, नागरिकांसाठी मोफत बस डे हवा. या दिवशी सरकारी व अन्य संस्थांनीही कर्मचाऱ्यांना त्यांच्या खासगी वाहनांचा वापर न करता बसने प्रवास करायला सांगावे. बस प्रवासासाठी प्रोत्साहन दिल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होऊन वाहतूक कोंडी कमी होईल. पुणे एअर अॅक्शन हबने मोफत बस दिवसांच्या फायद्यांविषयी ऑनलाइन जागरूकता सुरू केली आहे. नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्स, कल्पवृक्ष, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट, इनटॅक पुणे, इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज, पिंपरी- चिंचवड सिटीझन फोरम, बावधन सिटीझन्स फोरम, आयटीडीपी इंडिया आदी संघटनांनी ‘बस डे’च्या मागणीला पाठिंबा दिला आहे.




