पुणे : ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आतापर्यंत कशा पद्धतीने केला, याचा अंतिम अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) न्यायालयात सादर करणार आहे, अशी माहिती ‘सीबीआय’चे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.
या प्रकरणात ‘सीबीआय’ने निश्चित केलेल्या सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. आणखी काही साक्षीदार न्यायालयात सादर करायचे असल्यास सीबीआय त्यांची यादी १३ सप्टेंबरला न्यायालयात देणार आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती केली आहे.
या प्रकरणातील ‘सीबीआय’चे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. बचाव पक्षाच्यावतीने सिंग यांची उलटतपासणी मंगळवारी (ता. ५) पूर्ण झाली. अॅड. सुवर्णा वस्त यांनी त्यांची उलटतपासणी घेतली. डॉ. दाभोलकर कुटुंबीयांच्या दबावाखाली निरपराध लोकांना अटक केली का? किंवा राजकीय आणि सोशल मीडियाच्या दबावाखाली होतात का? असे प्रश्न बचाव पक्षाच्या वतीने अॅड. वस्त यांनी सिंग यांना विचारले, त्यावर सिंग यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. आतापर्यंत या प्रकरणात ‘सीबीआय’च्या वतीने २० साक्षीदार तपासण्यात आले आहे, त्यांची उलटतपासणीही घेण्यात आली.
…..यांची साक्ष नोंदवली
किरण केशव कांबळे, विनय केळकर या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ससूनच्या न्याय वैद्यक शास्त्र विभागाचे (पोस्ट मार्टम विभाग) डॉ. अजय तावरे, फिर्यादी नवनाथ रानगट, संजय साडविलकर, सोमनाथ धायडे आणि एस. आर. सिंग यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.




