पुणे : गोकूळ अष्टमीच्या दिवशी गुरुवारी (ता. ७) दहीहंडीचा उत्सव रात्री १० वाजेपर्यंतच साजरा करता येणार आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करण्यात येईल, असे शहर पोलिसांनी स्पष्ट केले.
शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिवर्धक वापरण्यास पूर्ण बंदी आहे. राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सवासाठी वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे शहरात रात्री १० वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सव होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक नुकतीच पार पडली. त्यात काही पदाधिकाऱ्यांनी दहीहंडी उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.
“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करता येणार नाही. मुंबई शहरातील मंडळांकडून साधारण दुपारपासून दहीहंडी उत्सव सुरू होतो. तो रात्री दहापूर्वी संपतो. परंतु पुण्यात दहीहंडी उत्सवाला सायंकाळी सुरुवात होते. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सव दुपारी सुरू करावा,” असे आवाहन पवार यांनी केले होते.
त्यानंतर काही मंडळाचे पदाधिकारी आणि राजकीय कार्यकत्यांनी पवार यांची भेट घेतली. परंतु पवार यांनी “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांना पालन करावे लागेल. त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सव साजरा करा. ” भलत्यासलत्या मागण्या करू नका, असा सल्ला मंडळांच्या पदाधिकारी आणि राजकीय कार्यकर्त्यांना दिला.




