मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. गणेशोत्सवापूर्वी हा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. आणखी १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात भाजपचा वाटा इतर दोघांपेक्षा मोठा असेल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ९ ऑगस्ट रोजी झाला होता. त्यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेचे ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि अन्य आठ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून २ जुलै रोजी शपथ घेतली होती. आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा तिसरा विस्तार लवकरच होणार असल्याचे म्हटले जाते.
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राष्ट्रवादीचे दोन नेते भाजपच्या श्रेष्ठींना दिल्लीत अलीकडेच भेटले. तुम्ही तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत एकत्र बसा, मंत्रिपदांचे वाटप आणि नावे निश्चित करा आणि पुन्हा दिल्लीला या असे त्यांना भाजप श्रेष्ठींनी सांगितले. त्यानंतर मुंबईत तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक झाली, अशी खात्रीलायक माहिती आहे. दोन-तीन दिवसांत पुन्हा एक बैठक होण्याची शक्यता आहे.



