पिंपरी (प्रतिनिधी) – जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघात जास्तीत- जास्त मतदार नोंदणी व्हावी यासाठी मतदान नोंदणी कार्यालयाकडून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याच अनुषंगाने सोमवारी (दि. ११) महापालिकेत प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
महापालिकेत झालेल्या या बैठकीला भाऊसाहेब कुटे, राकेश काळे, रवींद्र यंगड, सागर भोर, धनाजी तांबे, मिलिंद कंक, संतोष कलाटे, रमेश नरवडे, अशोक वाळके उपस्थित होते. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी तथा कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. नोंदणी अधिकारी देशमुख म्हणाले, निवडणूक आयोगाच्या फॉर्म क्रमांक ९, १०, ११, ११ अ आणि ११ ब याविषयी माहिती देण्यात आली. मतदार नोंदणी कार्यालयामार्फत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ब, ड, ग आणि ह या चार क्षेत्रीय कार्यालय व चिंचवड विधानसभा मतदार नोंदणी कार्यालय येथे प्रत्येक शुक्रवारी फॉर्म क्रमांक ९, १०, ११, ११ अ आणि ११ ब प्रसिद्ध करण्यात येत असतात. हे सर्व फॉर्म त्या मतदार नवीन नोंदणी, नावे वगळणे, नावातील दुरुस्ती, पत्ता बदलण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म हे निवडणूक कार्यालयाला प्राप्त होत असतात, त्या फॉर्मचा सारांश हा वरील फॉर्ममध्ये असतो. या पाच ठिकाणची माहिती होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
सर्व फॉर्मची सखोल माहिती देऊन त्यांची मतेही जाणून घेण्यात आली. या फॉर्ममधील त्रुटी अथवा यामधील आवश्यक बदल केल्यास मतदार शुध्दीकरणासाठी उपयोग होईल, यासह आदी सूचना राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. या सूचनांबाबत जिल्हा निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. या मतदारसंघात सध्या ५१० मतदान केंद्र आहेत. मात्र, मतदारांचा वाढता ओघ लक्षात घेता मतदान केंद्राच्या संभाव्य वाढी संदर्भात पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.




