पिंपरी (प्रतिनिधी) – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हे पूर्वी सायकलींचे आणि आता दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे कायद्याने बंधनकारक असले तरी येथील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे आहे. या दोन्ही शहरात हेल्मेट सक्तीचा विषय आला की नागरिकांचा त्यास तीव्र विरोध होतो. मात्र, ही हेल्मेट सक्ती बारगळते. मात्र पोलिसांनी छुप्या मार्गाने हेल्मेटसक्ती लागू केली आहे.
गेल्या पाच वर्षांत एक लाख ९३ हजार ३४० दुचाकीस्वारांवर विना हेल्मेटसंबंधी कारवाई केली आहे. त्यातून नऊ कोटी ६५ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड दुचाकीस्वारांना केला आहे.
देशातील रस्ते अपघातांमध्ये पहिल्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि सहाव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. असे असले तरी राज्यात झालेल्या रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक बळी हे दुचाकीस्वारांचे गेले आहेत. यापैकी बहुतांश दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. तसेच अपघातामध्ये डोक्याला मार लागून बळी जाणाऱ्यांमध्ये १८ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे.
विना हेल्मेट गाडी चालविणारांना ऑनलाइन दंड करण्यात आला आहे. मात्र हा दंड अनेकांनी भरलेला नाही. त्यामुळे बऱ्याच जणांच्या खिशाला विना हेल्मेटच्या दंडाची झळ बसलेली नाही. पोलिसांनी वाहनचालकांच्या विरोधात कोणतीही कारवाईची मोहीम उघडली की नागरिक रस्त्यांवरील खड्ड्याचा विषय सोशल मीडियातून उपस्थित करतात. पुण्यामध्ये अनेकदा हेल्मेटसक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्येकवेळी नागरिकांच्या रोषामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी हेल्मेट सक्तीची घोषणा न करता छुप्या मार्गाने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
… तरच हेल्मेटची कारवाई
याबाबत काही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता सरसकट विना हेल्मेटची कारवाई केली जात नाही. जर दुचाकीस्वाराने वाहतुकीच्या नियमांचा भंग केला तर त्यांच्यावर इतर केसेसप्रमाणे विना हेल्मेटची कारवाई केली जाते.




