पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी प्रसृत केले आहे. नवीन आकृतीबंधानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली. राज्य सेवेतील प्रदीप जांभळे आणि विजय खोराटे हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत. महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे १९ फेब्रुवारी २०२१ पासून अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी पदभार आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी २ मे २०२३ रोजीचा प्रस्ताव आणि शासनाने अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्तीसाठी स्थापन केलेल्या शासन स्तरावरील समितीची शिफारस विचारत घेवून नगरसचिव उल्हास जगताप यांची अतिरिक्त आयुक्तपदी निवडीने पदस्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली. महापालिका आस्थापनेवरील पात्र एकमेव अधिकारी असल्याने त्यांची अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्ती केली.दरम्यान, जगताप यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून दहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. नगरसचिव पदाची जबाबादारीही त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे.




