पिंपरी (प्रतिनिधी) आरटीई ही गोर-गरिबांना न मिळता धनदांडग्यांना मिळत आहे ही मोठी शोकांतिका आहे. आरटीईचे शासनाकडून वेळेत पैसे मिळाले जात नाही. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो. दोन वर्षांचे पैसे तिसऱ्या वर्षी मिळतात. आरटीईचे प्रवेश होताना सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते. मात्र, आम्हाला शासन पैसे देताना पुन्हा कागदपत्रे मागते. ती कागदपत्रे पुन्हा मागितले नाही पाहिजेत. या सर्व प्रकारामुळे संस्था चालक आरटीईला कंटाळलेला असल्याचे मत चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संचालक तथा पिंपरी-चिंचवड इंग्लिश मिडीयम मंडळाचे अध्यक्ष संदिप काटे यांनी व्यक्त केले.
काटे पुढे म्हणाले, मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न होत असतो. मात्र, पालक मुलांच्या दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक पाहत नाहीत. त्यामुळे पालकांनी वेळापत्रक पाहून दप्तरमध्ये वह्या, पुस्तके दिली पाहिजेत.
आधार कार्ड, पॅनकार्डसह संबंधित कुटुंबाचे उत्पन्नाची व्यवस्थित छाननी करूनच गोर-गरिबांच्या मुलांनाच आरटीईचा लाभ मिळाला पाहिजे, असे सांगत काटे पुढे म्हणाले, अनेक संस्था विना अनुदानित आहेत. मात्र, आर्थिक पाठबळ नसतानाही संस्था चालक मुलांच्या शिक्षणामध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत. संस्था चालकांना दर तीन वर्षांनी नूतनीकरण करावे लागते. यासाठी संस्था चालकांना मुंबईला जावे लागते. मात्र, हे नूतनीकरण करण्यासाठी पुण्यात व्यवस्था करावी. आणि तीन वर्षांपेक्षा सहा वर्षांचे नूतनीकरण करावे. शैक्षणिक संस्थेबरोबर सामाजिक कार्य करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, आवड असल्यामुळे शक्य होईल तेवढे समाजकार्य करण्याचा आपला प्रयत्न असतो असे काटे म्हणाले आहेत.




