पिंपरी ( प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपद अनेक महिन्यापासून रिक्त आहे. शहरातील एकमेव नेतृत्व असणारे माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांची प्रदेश पातळीवरती निवड झाल्यानंतर शहरातील अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती पक्षाला मिळत नसल्याची खंत कार्यकर्ते मध्ये आहे. त्यामुळे निवडीला अनेक महिन्याचा कालावधी लागणार आहे. सध्या क्रियाशील सभासद नोंदणी करण्यात आली आहे. त्यानंतर इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर चर्चा करून अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.
जुलै २०२३ मध्ये रिपाइ पक्षाची नवीन नोंदणी करण्यात आली. त्यामुळे राज्याभरातील कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने कार्यकारिणी निवडीच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी देखील प्रक्रिया गतीमान झाली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात क्रियाशील सभासद होण्याची अट घालण्यात आली आहे. ५० साधे सभासद करणाऱ्यालाच क्रियाशील सभासद होता येणार आहे. या क्रियाशील सभासदालाच पक्षाच्या पदांवर काम करता येणार आहे.
पक्षाकडून नवीन सभासद नोंदणीसाठीची दिलेली मुदत संपली होती. मात्र १५ दिवस मुदत वाढवून देण्यात आली. १८ सप्टेंबरपासून विविध पदांवर काम करणान्या इच्छुकांचे अर्ज मागविले जाणार आहेत.. आलेल्या अर्जांपैकी सर्व इच्छुकांशी शहरांतर्गत पक्षीय पातळीवर सामोपचाराने चर्चा केली जाणार आहे. पदांवर नियुक्तीबाबत चर्चा होणार आहे. या मध्ये मतभेद झाल्यास आलेली नावे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.
अर्ज मागवण्याचे सुरुवात झाली आहे. आलेल्या अर्जामध्ये आम्ही सामोपचाराने पदावर निवड करण्याबाबत चर्चा करणार आहे. ते न झाल्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे नावे पाठवली जातील. त्यांच्याकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. या प्रक्रियेला एक महिना लागण्याची शक्यता आहे.
– चंद्रकांता सोनकांबळे,
प्रदेशाध्यक्षा, रिपाइ महिला आघाडी (आठवले गट)




