वाकड : कर्मचारी महिलेशी लगट करीत तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी माय कार शोरूमच्या ‘सीईओ’ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 एप्रिल ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान वाकड येथील भूमकर चौकाजवळील माय कार शोरूम मध्ये घडला.
याप्रकरणी 27 वर्षीय पीडित महिलेने गुरुवारी (दि. 21) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सीईओ सोमन गौडा अमृता गौडा पाटील (वय 48, रा. आदर्शनगर, मुकाई चौक, किवळे) याच्यासह अन्य दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला भूमकर चौक, वाकड येथील माय कार शोरूममध्ये काम करीत होत्या. दरम्यान, आरोपीने त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, अश्लील इशारे करीत महिलेला केबिनमध्ये बोलवले. पीडित महिलेने याकडे दुर्लक्ष केले असता इतर आरोपी महिलांनी पीडितेला ”पाटील सरांसोबत बोलत जा, ते तुझा व मुलाचा सांभाळ करतील, तुला काही अडचण येणार नाही”, असे बोलून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
पीडितेने स्पष्ट नकार दिला असता आरोपींनी आपसात संगनमत करून पीडितेची बदनामी करीत तिला कामावरून काढून टाकले. दरम्यान, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पीडित महिला पार्किंगमधून दुचाकी काढत असताना आरोपी पाटील याने त्यांचा हात पकडला, असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
भूमकर चौक, वाकड येथील माय कार शोरुममध्ये काही दिवसांपुर्वी देखील असाच प्रकार समोर आला होता. त्यावेळी देखील एका पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, सीईओ सोमन गौडा अमृता गौडा पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुरुवारी (दि. 21) सलग दुसरा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.