मुंबई – मुंबईसह देशातील लाखो अन् कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भक्त-भाविक मुंबईत दाखल होत असतात. लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी भाविक भल्या मोठ्या रांगेत उभे राहून बाप्पाचं रूप पाहण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाचा सहावा दिवस असल्याने आजही राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी आहे.
तर राज्याच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असल्याने भाविकांना तासन् तास राज्याच्या दर्शनासाठी प्रतिक्षेत आहे. गर्दीमुळे भक्तांची लालबागच्या सभामंडपात मोठी गैरसोयदेखील होत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, अश्यातच काल राजाच्या दरबारातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्या व्हिडिओची दखल घेतली आहे.
अजित पवार म्हणाले की, “माझ्या कानावर ही बाब पडली. काही भगिनींना तिथं भोवळ आली, त्यानंतर तशी परिस्थिती झाली. लालबागचा राजा देश पातळीवर प्रसिद्ध झालाय, अशातच व्हीआयपी जातात. त्यामुळं सामान्यांना ही तिथं जावंस वाटतं. लालबागचा राजा हा जागरूक गणपती आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं तिथं दर्शनाला मोठी गर्दी होते. व्हीआयपीसाठी वेगळी आणि सामान्यांसाठी वेगळी रांग केलेली आहे. तरी ही अशी परिस्थिती उद्भवली, तर गणेश मंडळांची जबाबदारी असते, अन सरकार म्हणून आमचे पोलीस त्यांना सहकार्य करतील’ असं अजित पवार म्हणाले.