पिंपरी (प्रतिनिधी) कोणतेही वाहने चालवताना मोबाइल वापरण्यावर बंदी आहे. तरीही हजारो वाहन चालकांकडून त्याकडे सर्रासपणे कानाडोळा केला जात आहे. यातून अपघाताचा धोका असून अशा वाहन चालकांना दंडदेखील आकारण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी गेल्या पाच वर्षात एक लाख ३९ हजार ५७७ वाहनचालकांवर कारवाई करीत पाच कोटी ७३ लाख ८८ हजार रुपयांचा दंड आकारला आहे.
अनेक दुचाकीस्वार वाहन चालविताना कानाला मोबाइल लावून मान वाकडी करून फोनवर बोलत असतात. त्यामुळे त्यांचे एकाचवेळी दोन्ही ठिकाणी लक्ष असते. काही वाहन चालक कानाला हेअरफोन लावून गाणी ऐकतात किंवा मोबाइलवर बोलतात. अशा चालकाची पाठीमागील वाहन चालकाने हॉर्न वाजविला तरी त्याची चिडचिड होते. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.
मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत घट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू झाले. त्यानंतर २०१९ मध्ये मोबाइलवर बोलणाऱ्या तब्बल ५७ हजार १०९ वाहन चालकांवर कारवाई केली. मात्र त्यानंतरच्या कोणत्याच वर्षांत पोलिसांच्या कारवाईचा आकडा २३ हजारांवर गेला नाही. एकीकडे बेशिस्त वाहन चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मोबाइलवर बोलणाऱ्या वाहन चालकांची संख्या कमी कशी झाली, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे शहरात दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे २४ हजार वाहनधारकांना चांगलेच महागात पडले आहे. वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास ४७ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार पाचशे रुपयांचा दंड केला. मोटार वाहन कायद्यात नवी तरतूद करण्यात आली त्यानुसार १ हजार रुपये दंड करण्यात आले. तसेच तो वाहनधारक दुसऱ्यांदा मोबाईलवर बोलताना आढळला तर त्याला ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद केली आहे. मात्र नव्या नियमानुसार एकही वाहनधारक आढळले नाही.




