पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड शहरात खासगी जागेत उभारण्यात आलेले जाहिरात होर्डिंग स्ट्रक्चरसह विकले जातात. अशा होर्डिंगचे परवाना शुल्काच्या १० टक्के रक्कम आकारून त्याचे महापालिकेकडून हस्तांतरण करण्यात येणार आहे. या नव्या नियमास मान्यता देण्यात आली आहे.
शहरात खासगी जागेत एकूण १ हजार १३६ अधिकृत जाहिरात होर्डिंग आहेत. या होर्डिंगचालकांना महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने परवाना दिला आहे. शहरातील खासगी जागेतील काही जाहिरात एजन्सीने होर्डिंगची विक्री केली आहे. होर्डिंग विकत घेतलेल्या जाहिरात एजन्सीने आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे अर्ज केले आहेत. शासनाच्या नियमानुसार असे हस्तांतरण करण्याचा नियम नव्हता. मात्र, राज्य शासनाच्या जाहिरात नियमन व नियंत्रण ९ मे २०२२ च्या अधिसूचनेतील कलम २४ नुसार नव्याने जाहिरात होर्डिंग हस्तांतरणाची तरतूद करून दिली आहे. त्यानुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाने जाहिरात होर्डिंग हस्तांतरणास मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे म्हणाले, शहरातील खासगी जागेतील सुमारे २५ जाहिरात होर्डिंगचे हस्तांतरण करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. परवाना शुल्काच्या दहा टक्के रक्कम भरून घेऊन हे हस्तांतरण केले जाणार आहे.




