पिंपरी : कडक शिस्तीमुळे प्रशासनावर वचक असलेले उपमुख्यमंत्री अजित यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. पालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकारी यापूर्वी भाजप, शिवसेना नेत्यांच्या कलानुसार कामकाज करत होते. त्यामुळे आता त्यांची कोंडी असून पवारांच्या कलानुसार त्यांना कारभार करावा लागण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर गेल्या दीड वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांचीच प्रशासक म्हणून सरकारने नियुक्ती केली. मात्र, जून २०२२ मध्ये राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले आणि ऑगस्ट २०२२ मध्ये राजेश पाटील यांची दीड वर्षांतच बदली करून शेखर सिंह यांना आयुक्त म्हणून आणले. सिंह यांना महापालिकेत येऊन सुमारे सव्वा वर्षांच्या कालावधी झाला आहे. या कालावधीत आयुक्त सिंह यांनी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या कलानुसार कामकाज केले. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या कामांना काही प्रमाणात ब्रेक लागण्याची व पर्यायाने त्यांची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होताच उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिकेत येऊन प्रलंबित प्रश्नाचा आढावा घेतला होता.. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या कामांचे लेखा परीक्षण करण्याचा इशारा दिला होता. पवार यांनी चार तास आढावा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. अजित पवारच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने ते महापालिकेतील विविध कामांचा वेळोवेळी आढावा घेण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.




