पुणे :- राज्यात आवश्यक तेथे हेलिपॅड उभारणीसाठी तसेच एअर अॅम्ब्युलन्स सुविधा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडला नोडल एजन्सी म्हणून काम करता येईल, असा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे या ठिकाणी अपघात झाल्यास तत्काळ मदत व बचावासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपयुक्त ठरते. याशिवाय रुग्णांच्या सेवेसाठी एअर अॅम्ब्युलन्स सेवा आवश्यक ठरते. अशा सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांशी समन्वय साधण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिर्डी, अमरावती तसेच कराड यांसह विविध विमानतळ विकासाच्या कामांचा आढावाही घेतला. राज्यात शक्य असेल, त्या ठिकाणी विमानतळ किंवा धावपट्ट्यांच्या ठिकाणी नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या.



