मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर पक्ष कुणाचा, पक्षचिन्ह कुणाचं, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष कोण हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला आहे. शुक्रवारी (६ ऑक्टोबर) यावर सुनावणी झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने अजित पवार गटातील बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली.
सुनील तटकरे म्हणाले, “या प्रश्नांवर आमच्याकडे सर्व उत्तरं आहेत. प्रत्यक्षात सुनावणीतील युक्तिवादात जेव्हा हे मुद्दे येतील त्यावेळी ती उत्तरं आम्ही मांडू. आम्ही या गोष्टीची कायदेशीर व वैधानिक खातरजमा करूनच आम्ही हे पाऊल उचललं आहे. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून हा निर्णय घेतला. त्यामुळे मी आत्ताही दावा करतो की, लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतलेल्या निर्णयावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब आम्हाला मिळावं अशी आमची सर्वांची भावना आहे.



