मुंबई – पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यासमोरील अडचणी पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसून येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळुन लावली आहे.
एकनाथ खडसे यांनी एसीबीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने खडसेंना कठोर कारवाईपासून आजपर्यंत दिलासा दिला होता. मात्र, आता हायकोर्टाने ही याचिका फेटाळल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि इतर काहीजण आरोपी आहेत. दोन वर्षांच्या कारावासानंतर गिरीष चौधरी यांना नुकताच जामीन मिळाला आहे. (eknath khadase high court)
काय आहे प्रकरण?
राज्यातील भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला असा आरोप झाला होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप होता, त्यामुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामध्ये खडसेंसह त्यांच्या जावयाची देखील ईडी चौकशी झाली होती.